फुलवळ ; धोंडीबा बोरगावे
घ्या कोविड ची लस अन जीवन जगा मस्त असे म्हणत कर्मचाऱ्यांची वारी आता प्रत्येकांच्या दारी.. अधिकाऱ्यांसह कर्मचारी आता प्रशासनाच्या वतीने व कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेऊन प्रशासनास सहकार्य करा, अशी विनंती करत ग्रामीण भागात प्रत्येकाच्या दारोदार फिरत असल्याचे दिसून येत आहे.
कोविड १९, डेल्टा, पाठोपाठ आता ओमायक्रॉनच्या नैसर्गिक संकटाने तोंड वर काढले असून ह्याच्या अतीव्रतेने संसर्ग वाढत आहे. हा संसर्ग वेळीच थांबण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणे हाच एकमेव उपाय आहे. त्यासाठी १८ वर्षावरील सर्वांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणे अनिवार्य आहे. यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबवत जनजागृती करण्यात येत आहे. एवढे करूनही जनतेचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट दिसून येत होते.
ज्या गावात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण झाले नाही, अशा गावात जे अधिकारी व कर्मचारी नेमून दिले आहेत यांना जबाबदार धरून योग्य ती कारवाई करण्याचा इशारा वर्षा ठाकूर यांनी आढावा बैठकीत दिला. आणि येत्या १६ डिसेंबर २०२१ पर्यंत गावात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याची डेडलाईन दिली.
त्यामुळे विविध विभाग प्रमुखांसह ग्राम पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी १६ डिसेंबर २०२१ या तारखेची धास्ती घेतली असून १०० टक्के लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही ‘दार उघडा दार’ आम्ही कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची माणसं आहोत, असे म्हणत प्रत्येकाच्या घरी जाऊन दरवाजा ठोठावत असल्याचे दिसून येत आहे.
कोविड १९, डेल्टा पाठोपाठ आता ओमायक्रॉन या संसर्गजन्य विषाणूचे नैसर्गिक संकट आले असून या संसर्गाची झपाट्याने वाढ होत आहे. ही वाढ वेळीच थांबण्यासाठी कोरोना लसीकरण करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
त्यासाठी प्रशासनासोबत लोकप्रतिनिधी व स्वयंसेवकांनी या कामी सहकार्य करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी या उद्भवलेल्या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन गटविकास अधिकारी सुदेश मांजरमकर यांनी केले आहे.
त्यानुसार फुलवळसह अंतर्गत सर्वच ठिकाणी आरोग्य कर्मचारी , शिक्षक , शिक्षिका , अंगणवाडी कर्मचारी , आशा वर्कर , ग्रामसेवक हे सर्व घरोघरी फिरून जनजागृती करत १८ वर्षावरील सर्वांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करत आहेत.