(नोंदणी अर्जासाठी 2 हजार फी ची बंदी , अन वयाची अट नसल्याने वयोवृद्धांनाही संधी ? )
फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
फुलवळ ग्राम पंचायत साठी गेली अनेक वर्षांपासून इब्राहिम आबास पठाण हे रोजगार सेवक म्हणून कार्यरत होते. परंतु कांही दिवसांपूर्वीच त्यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाल्यामुळे सदर जागा रिक्तच आहे .
रोजगार सेवक हा ग्राम पंचायत , पंचायत समिती व जनतेतला दुवा मानला जातो. अनेक कामे ही रोजगार सेवकांच्या माध्यमातूनच पूर्ण केली जातात. तेंव्हा फुलवळ येथील इब्राहिम पठाण यांच निधन झाल्यापासून सदर जागा रिक्त असल्याने जनतेच्या कामांचा खेळखंडोबा होऊ नये किंवा कोणाचेही कामे प्रलंबित पडू नयेत या हेतूने लवकरात लवकर हे रिक्त पद भरून घेण्यासाठी ग्राम पंचायत ने एक जाहीर प्रगटण प्रकाशित करून इच्छुक उमेदवारांकडू अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे.
अर्ज दाखल करण्यासाठी नोंदणी शुल्क म्हणून तब्बल 2 हजार रुपये फी आकारण्यात येणार असल्याचे जाहीर केल्याने ग्रामस्थांतून एकीकडे उलट सुलट चर्चा ऐकायला मिळत आहे तर दुसरीकडे एवढी फी आकारण्याचे जसे लक्षात आले तसे इच्छुकांसाठी कसलीच वयाची अट ठेवण्यात आली नसल्यामुळे वयोवृद्धांना , सेवानिवृत्त लोकांनाही चांगला दिलासा मिळाला असल्याने आता कोणीही आणि कितीही वयाचा असला तरी चालेल पण १० वी पास , संगणक परीक्षा पास आणि दोन हजार रुपये फी भरायची तयारी असणाऱ्यांना रोजगार सेवकासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असल्याची वेगळी चर्चा ऐकायला मिळत आहे.
फुलवळ ग्राम पंचायत कडून प्रकाशित करण्यात आलेल्या जाहीर प्रगटणात ता. १० जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत इच्छुकांनी आपापले अर्ज दाखल करावेत , आणि अर्जदारांसाठी खालील बाबींचे नियम व अटी ठेवण्यात आल्या आहेत.
१) उमेदवार हा किमान १० पास असावा , MSCIT किंवा तत्सम संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. २) उमेदवाराचे चारित्र्य निष्कलंक असावे तसेच गावकऱ्यांचे त्याच्याबद्दल मत चांगले असावे. ३) उमेदवाराचे आरोग्य उत्तम असावे . ४) गावातील अंग मेहनतीचे काम करण्यास सक्षम असलेल्या प्रौढ व्यक्तींना विशेषतः महिला , अनु जाती / जमातीच्या व अन्य तत्सम प्रवर्गातील ग्रामस्थांना हाताळण्याची क्षमता त्यात असावी. ५) अर्जासोबत 2 हजार रुपये शुल्क भरावे लागेल व सदर शुल्क परत मिळणार नाही . ६) सदर रोजगार सेवक पदासाठी योग्य उमेदवाराची ग्रामसभेत निवड झाली तर ठीक अन्यथा ग्रामसभेच्या शिफारशीनुसार गुप्त मतदान घेऊन निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल असाही उल्लेख करण्यात आला आहे.
ग्रामस्थांत व इच्छुकांत आता एकच चर्चा ग्राम पंचायत याच जाहीर प्रगटणावर ठाम राहणार ? का पुन्हा त्यात बदल करून दुसरे जाहीर प्रगटण काढून अर्ज दाखलाच्या तारखा बदलून नव्याने अर्ज मागवणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.