फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील फुलवळ तसे प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आणि नाविन्यपूर्ण म्हणून ओळखले जाते , फुलवळकरांत एक आगळावेगळा जुणून भरलेला असतो याची प्रचिती नेहमीच आपण वारंवार बातम्यांच्या माध्यमातून वाचतो , असंच आणखी एक यश फुलवळच्या मातीला लाभले असून एम बी बी एस च्या पहिल्याच यादीत येथील तीन विद्यार्थी प्रवेश पात्र ठरले असल्याने मेडिकल क्षेत्रात फुलवळ ची गगन भरारी मारल्याचा आनंद विद्यार्थी , पालक व गावकऱ्यांचा चेहऱ्यावर ओसंडून वाहतांना दिसून येत आहे.
फुलवळ व फुलवळकर हे नेहमीच विविध क्षेत्रात कार्यरत असल्याने वारंवार चर्चेचा केंद्रबिंदू म्हणून फुलवळ ची एक वेगळी ओळख सर्वत्र आहे. त्यातच नुकतेच मेडिकल साठी प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची पहिली यादी प्रकाशित झाली आणि फुलवळ च्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा मोठ्या डौलाने रोवला गेला ते या तीन भावी डॉक्टरांच्या प्रवेश निश्चितीने.
तर ते तीन भावी डॉक्टर म्हणजे कु. अनुजा चंद्रकांत फुलवळकर ला नीट मध्ये ५७४ गुण प्राप्त असल्याने तीचा पहिल्याच यादीत स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज अंबाजोगाई या शासकीय कॉलेज ला प्रवेश निश्चित झाला आहे. तर दुसरा विक्रम संजय शेंबाळे ला नीट मध्ये ५५१ गुण प्राप्त असल्याने त्याचा महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च मेडिकल कॉलेज लातूर येथे प्रवेश निश्चित झाला आहे. आणि तिसरा प्रसाद परमेश्वर मंगनाळे ला नीट मध्ये ५३९ गुण प्राप्त असल्याने त्याचा मायमर मेडिकल कॉलेज मावळ पुणे येथे प्रवेश निश्चित झाला आहे.
या तिघांच्या यशस्वी शैक्षणिक वाटचालीने स्वतः बरोबरच पालक व गावकऱ्यांच्या माना उंचावल्या असल्याने त्यांनी संपादित केलेल्या यशाबद्दल या तिघांवर ही सर्वच क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून भावी कारकिर्दीस व शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देऊन गौरव केला जात आहे.