कंधार औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातील प्रकार..
फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
कंधार औद्योगिक वसाहतीत २४ तास पाणी, दिवाबत्ती व रस्त्यांची व्यवस्था आहे. तर औद्योगिक विकास महामंडळाचा परिक्षेत्र दर्शविणारा फलक असणे गरजेचे आहे. परंतु तो दिशादर्शक फलक अद्याप बसविण्यात आला नाही. याच कार्यालयामार्फत भांडारगृह बांधण्यात आले होते. परंतु त्या भांडारगृहास एकही दार किंवा एकही खिडकी राहिली नसून टीनशेडही नाहिसे होऊन सदर भांडारगृहात झाडा-झुडपांनी आपले बस्तान बांधले असून भांडारगृहाची दयनीय अवस्था झाली आहे. तसेच भांडारगहाच्या सभोवताली काटेरी झुडपांनी विळखा घातला आहे. त्यामुळे हे भांडारगृह भूतबंगला झाल्याचे भासत आहे. हा सर्व प्रकार वरिष्ठ अधिकार्यांनी डोळेझाक करुन नियमित शून्य कारभाराचा कळस गाठल्याचा एक प्रकार होय !
आज घडीला पर्यावरणाचे संतूलन राखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करोडो रुपये खर्च करून वृक्षलागवडीस प्रोत्साहन देण्यात येत आहेत. तर अनेक सामाजिक संस्था स्वखर्चातून वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबवत आहेत. वाढती लोकसंख्या व वाढत चाललेले औद्योगिकरण यामुळे पर्यावरणाचे बिघडत चालले संतूलन हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहत असताना औद्योगिक विकास महामंडळाचा कारभार मात्र सर्वांच्या डोळ्यात धूळ फेकत असल्याचे दिसून येत आहे.
मूळातच कंधार हे औद्योगिक क्षेत्र असून येथील निर्माण होणारे प्रदूषण येथेच रोखले पाहिजे, हा मुख्य उद्देश असतानाही एमआयडीसीच्या नियोजनामुळे निर्माण होणारे प्रदूषण थांबविण्या ऐवजी प्रदूषण वाढविण्याचाच प्रकार होय. भविष्यात या औद्योगिक वसाहतीचे प्रदूषण वाढून परिसरातील युवकांना विविध प्रकारचे विशेषतः श्वसनाचे आजार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कंधार तालुका हा डोंगराळ भाग असून या भागातील गरीब होतकरू सुशिक्षित तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध व्हावा हा मूळ उद्देश समोर ठेवून तत्कालीन आमदार भाई डॉ.केशवराव धोंडगे यांच्या प्रयत्नातून सन १९८९ साली या औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झाली आहे. परंतु गेल्या ३३ वर्षांपासून अधिकाऱ्यांच्या अशा ढिसाळ नियोजनामुळे एकही मोठा उद्योग या ठिकाणी उभा राहू शकला नाही. या २५ एकच्या औद्योगिक वसाहतीत केवळ तीन चार लघुउद्योग सोडले, तर बाकी एकाही मोठ्या उद्योजकाने आपला उद्योग या ठिकाणी उभारला नसल्यामुळे हे क्षेत्र भकास दिसत आहे.
ह्या वसाहतीत चोवीस तास पाणी उपलब्ध असून लागवड केलेल्या वृक्षाला ठिबक सिंचनाची व्यवस्था केली आहे. परंतु या ठिबकद्वारे झाडांना पाणी देणे आवश्यक असताना देखील जाणीवपूर्वक गेल्या सहा महिन्यापासून या कोवळ्या रोपट्यांना पाणी सोडले नसल्यामुळे सर्वत्र भेगा पडत असून झाडे करपत आहेत. त्यासाठी झाडे करपण्यास कारणीभूत असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून लावलेल्या कोवळ्या झाडांना जीवदान देण्यासाठी तात्काळ पाण्याची व्यवस्था करावी, असे वृक्षप्रेमींतून बोलल्याचे ऐकावयास मिळत आहे.