विद्युत वितरण विभागाने ग्राहकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.. दोन महिन्यापासून फुलवळ येथे विद्युत पुरवठा चा खेळखंडोबा , एका नंतर एक असे नऊ डेपो जळतातच कसे..?

 

विद्युत पुरवठाशी खोडाळक्या करणाऱ्यांचा तपास लावून मुसक्या आवळायला हव्या..

फुलवळ  ( धोंडीबा बोरगावे )

कंधार तालुक्यातील फुलवळ येथील बसस्थानक शेजारी असलेल्या आणि मुख्य मार्केट लाईनसह गावात विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत डेपोचा गेल्या दोन महिन्यांत किती वेळा विद्युत पुरवठा खंडित झाला याचा काही हिशोबच नाही तर तब्बल नऊ वेळा डेपो ही बदलण्यात आले , परंतु डेपो बसवताच एक-दोन दिवसात भला मोठा आवाज होऊन पुन्हा विद्युत पुरवठा बंद पडत असल्याने ग्राहक पार वैतागले असून असे नेमके कशामुळे होत असावे याचा अंदाज कोणालाही लागत नसून लाईट बंद असल्याने आता पाणी , दळण , झेरॉक्स पण मिळत नसल्याने ग्राहकांतून संताप व्यक्त केला जात आहे तर व्यावसायिकांच्या धंद्यावर याचा चांगलाच परिणाम होत आहे. तेंव्हा ऐन दिवाळी च्या तोंडावर जर हीच परिस्थिती राहिली तर विद्युत वितरण विभागाने त्या खोडाळक्या करणाऱ्यांचा तपास लावून सुरळीत वीज पुरवठा द्यावा अन्यथा ग्राहकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अशी विद्यूत ग्राहकांतून चर्चा ऐकायला मिळत आहे.

फुलवळ येथील मुख्य ठिकाण च्या विद्युत डेपो वरून गेली तीन महिन्यापासून विद्युत पुरवठ्याचा चांगलाच खेळखंडोबा चालू असून आजपर्यंत जवळपास नऊ डेपो ही बदलण्यात आले. तरीपण अद्यापही विद्युत पुरवठा सुरळीत व्हायला तयार नसल्याने व्यावसायिकांना व ग्राहकांना याचा चांगलीच झळ सोसावी लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी व दळणासाठी , झेरॉक्स साठी , इतर कोणत्याही लाईट शी संबंधित कामांसाठी बाहेर गावला जावे लागत आहे.

वारंवार डेपो जळण्याचे व भला मोठा बार होऊन आवाज येऊन विद्युत पुरवठा बंद होण्याचे कारण विचारले तर कुठेतरी स्पार्किंग होत असावी कारण बऱ्याच ठिकाणी आकडे टाकून विद्युत पुरवठा चालू असावा म्हणून तर फेज , न्यूट्रल एकत्र झाल्याने डेपो जळत आहेत असेच सांगण्यात येते. विशेष बाब म्हणजे फुलवळ हे जि.प. गटाचे जवळपास सहा-साडेसहा हजार लोकसंख्या असलेले गाव असून येथे एक लाईनमन आणि एक हेल्पर चे पद असून येथील दोन्ही पदे रिक्तच असल्याने शेजारी गावच्या लाईनमन कडे येथील चार्ज दिला आहे. त्यामुळे तेही येथे पूर्ण वेळ कार्यरत नसल्याने आकडे टाकणारे किंवा डायरेक्ट विद्युत जोडणी करून घेणारे तसेच लाईनमन नसतांना कोणीही सरळ डेपो ला जाऊन नको ते कारभार करणारे कोण ? यांच्यावर कोणाचीही वचक नसल्यागत परिस्थिती निर्माण झाली असून कोणीही यावं आणि टिकली मारून जावं असाच प्रकार तयार झाला आहे याचा ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

त्याच डेपो वरून अनेक वीज ग्राहकांची विद्युत जोडणी आहे. वीज बिल ही बहुतांश ग्राहक दर महिन्याला वेळेवर जमा करतात त्यामुळे बिल वसुलीत नंबर एक असतांनाही विद्युत पुरवठासाठी दररोज झगडावे लागत आहे. वीज ग्राहकांना दोन महिन्यापासून एवढा नाहक त्रास होत असतांना ही सगळेच असे चिडी चुप्प गप्प बसले असून केवळ गावातच पोकळ चर्चा करत घरातच बसून आमची लाईट नाही हो , प्यायला पाणी नाही , दळण नाही , झेरॉक्स मिळत नाही. आणखी किती दिवस लागतील असे प्रश्न करत पत्रकारांनी बातमी तर द्यायला पाहिजे अशा अपेक्षा व्यक्त करणारे जाणकार लोक मात्र घराबाहेर पडायला तयार नाहीत किंवा त्या विद्युत वितरण विभागाच्या कार्यालयात जाऊन कोण्या अधिकाऱ्याला बोलायला , जाब विचारला तयार नाहीत. एरव्ही मात्र नेतेगिरीत फुलवळ कुठेच कमी पडलेले आढळून येत नाही. त्यामुळे गावाला कोणी नाही खंबीर वाली नसल्यागत अन विद्युत विभागाचा कारभार रामभरोसे झाला की काय ? असेच म्हणण्याची वेळ आली आहे.

सरपंच प्रतिनिधी प्रतिक्रिया..

गेल्या दोन महिन्यांत जवळपास नऊ डेपो जळाले असून अजूनही विद्युत पुरवठा सुरळीत झाला च नाही , यासंदर्भात गाव प्रमुख म्हणून वेळोवेळी विद्युत वितरण कार्यालयाला संपर्क साधून वास्तव परिस्थिती लक्षात आणून दिले असता संबंधित अधिकाऱ्यांनी वारंवार सहकार्याची भावना ठेवत आजपर्यंत नऊ डेपो दिले.

परंतु नेमका कुठे फाल्ट आहे किंवा नेमकं कोण याबद्दल चुकीचे काम करत आहे हेच कळत नसून लवकरच नवीन डेपो बसवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी आज पुन्हा सांगितले असून विजेसोबत कोण खोडाळक्या करत आहे याचाही तपास लावण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी बोलले असल्याची प्रतिक्रिया सरपंच प्रतिनिधी यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *