कालच्या भागात जरी मी लिहिले होते की, रात्री साडेदहाला दुसरा भाग लिहून पूर्ण झाल्यावर पडल्या पडल्या झोप केव्हा लागली हे समजले नाही . असे असले तरी काही विचार हे मनात असतातच. जे आपल्या मानसिक पातळीवर सुरूच असतात. त्यातलाच एक विचार म्हणजे गेल्या वीस वर्षापासून सातत्याने आयोजित करत असलेली ही अमरनाथ यात्रा. हे २१ वे वर्ष. आपल्या संस्कृतीत काही आकड्यांना विशेष महत्त्व आहे जसे की ११,२१,५१,१०८.
आपण कोणत्याही देवतेचा जप करतो ती माळ १०८ मण्यांची असते. नामस्मरणात १०८ या संख्येला खूप महत्त्व आहे. शिव शंकराचा केला जाणारा ओम नमः शिवाय हा मंत्र देखील १०८ वेळा म्हंटला जातो. उपहार स्वरूप भेट दिल्या जाणाऱ्या राशीमध्ये ५१ या आकड्याचे महत्त्व जास्त आहे. तसेच २१ या आकड्याचे देखील आगळे वेगळे महत्त्व आहे. कार्यारंभी प्रथम ज्याचे पूजन केले जाते त्या गणेशाला वाहिल्या जाणाऱ्या दुर्वांची संख्या ही २१ आहे. गणपतीला नैवेद्य म्हणून अर्पण केल्या जाणाऱ्या मोदकांची संख्या देखील २१ आहे.त्यामुळे अमरनाथ यात्रेचे हे २१ वे वर्ष देखील खासच. या अगोदरच्या सर्व यात्रा ह्या सहभागी यात्रेकरूंच्या संपूर्ण सहकार्यासह आणि विविध ठिकाणच्या संपर्कातील मित्रवर्गाच्या सहकार्याने खूप यशस्वी झाल्या.याचा मनस्वी आनंद तर आहेच पण यावर्षी देखील बाबा बर्फानीची यात्रा उत्तम नियोजनासह दोन टप्प्यात कशी यशस्वी करायची याचे नियोजन अंतर्मनात झोप घेताना देखील चालूच होते.
पहिल्या दिवशीची दोन्ही वेळची भोजन व्यवस्था छान होती अशा प्रतिक्रिया सहप्रवासी यात्रेकरूंनी दिल्यामुळे मनात आनंदाची भावना तर होतीच पण आत्मविश्वास देखील दुणावला होता. या तरल भावनेत लागलेली झोप सकाळी नेहमीप्रमाणे पाच वाजता उघडली.
नांदेडहून एक तास उशिरा निघालेली गाडी जवळजवळ पावणे दोन तास लेट होत सकाळी साडेपाचच्या आसपास ग्वाल्हेर स्टेशनवर उभी होती. या यात्रेतील सहप्रवासी अभय शृंगारपुरे यांच्यासोबत सकाळचा पहिल्या चहाचा आस्वाद घेतला. आणि यात्रेतील पुढील नियोजनास लागलो. या यात्रेत सोबत असलेल्या अशोक जयस्वाल यांच्या सोबत सकाळच्या नाश्त्याचे आधीच बोलणे झाले असल्यामुळे त्याची काळजी नव्हती. आग्रा स्टेशनवर जयस्वाल यांनी बाहेरच्या थ्री स्टार हॉटेल मधून आणलेला नाश्ता त्यांची कन्या श्रुष्टी हिने सर्वांना आग्रहाने वाटप केला. आजचा पोहे समोस्याचा मेनू
अत्यंत चविष्ट असा असल्याच्या प्रतिक्रिया परत एकदा यात्रेकरूंनी दिल्या.भरपेट असा हा नाश्ता झाल्यानंतर मग डब्यात प्रवासी यात्रेकरूंनी अंताक्षरी खेळाव्यास सुरुवात झाली.म्हणता म्हणता छान मैफिल जमली, आणि या मैफिलीत मग केव्हा भजन रंग चढला ते कळलेच नाही. एकापेक्षा एक छान भजन सर्व महिला यात्रेकरूंनी सादर केली. अस्मादिकांनीदेखील सहभागी होत एक दोन भजनं म्हटली. हळूहळू सर्वच प्रवासी यात्रेकरू आता मोकळेपणाने वावरायला सुरुवात झाली होती.
असे म्हणतात की, राजकीय नेत्याने दिलेले आश्वासन ही प्रत्यक्षात कधीच उतरत नाही. परंतु दिलेल्या आश्वासनाप्रमाणे नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नवी दिल्ली येथे त्यांचा सारथी सिकंदर मार्फत सर्व यात्रेकरूंची दुपारच्या जेवणाची सोय केली होती. खा. चिखलीकर हे स्वतः बाहेर असल्यामुळे त्यांनी मोबाईल वरून प्रवाशांशी संपर्क साधला व अमरनाथ यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.स्वादिष्ट
भोजनावर येथेच ताव मारल्यानंतर बरेच जण ज्याच्या त्याच्या मोबाईल मध्ये मग्न झाले. कोणी राम नामाचे जपाची वही काढली तर कोणी आपल्या घरी फोन लावून प्रवासातील खुशाली कळवण्यात गुंग झाले. मी नेहमीप्रमाणे प्रवासातील पुढच्या टप्प्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली.
आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे संध्याकाळचे भोजन हे निद्रेपूर्वी दोन तास घ्यायचे असते.यावेळेस अमरनाथ यात्रेस येणाऱ्या प्रवाशांची संध्याकाळची जेवणाची वेळ ही सात वाजताची आहे हे लक्षात आल्यामुळे रेल्वे प्रवासात त्यांना याच वेळेत भोजन द्यायचे ठरवले.त्याप्रमाणे लुधियाना येथील मित्र सरदार कुलदीपसिंघ दीपा यांच्याशी संपर्क केला.त्यांनी देखील अत्यंत आनंदाने हे आतिथ्य मान्य केले.
लुधियाना स्टेशनवर संध्याकाळी साडेसहा वाजता कुलदीपसिंघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आमचे गर्मजोशीत स्वागत केले. त्यांनी आणलेले रात्रीचे भोजन हे वर्णन करण्या पलीकडे इतके स्वादिष्ट आणि पचायला हलके फुलके होते की विचारूच नका . पंजाबी पद्धतीने बनवलेले छोले भटूरे, अक्रोड बदाम पिस्ते आणि जगदाळे यासारख्या सुखामेळापासून बनवलेली परंतु जास्त साखर नसलेली रुचकर अशी खीर आणि पचायला हलका असा मोठा बंद पाव व त्याला लावलेले साजूक तूप. सर्वच प्रवाशांनी हे जेवण घेतल्यानंतर त्यांना फोन करून धन्यवाद दिले.दिलेल्या सूचनेप्रमाणे चार तास म्हणजे जम्मू तावी ला पोहोचेपर्यंत सर्वांना सक्तीने निद्रादेवीची आराधना करायला लावली . काही यात्रेकरूनीं झोपण्यापूर्वी आपल्या आराध्य देवतेची उपासना देखील केली. तर काहींनी तालीम मंत्र जप केला. आम्ही सगळेच आता जम्मू तावी केव्हा येते याची वाट पाहू लागलो.
या प्रवासात अनेकांनी स्वयंस्फूर्तीने गाडीमध्ये नाश्ता व भोजन वितरणाची व्यवस्था खूप सुंदर रित्या निभावली याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.मध्यरात्री आम्ही जम्मू स्टेशन ला उतरून हमसफर चा निरोप घेतला.
||केल्याने देशाटन… मनुजा येई हो शहाणपण…||
या उक्तीचा अनुभव घेण्यास आम्ही सर्व परत एकदा सिद्ध झालो.
(क्रमश:)