भाई केशवराव धोंडगे यांच्या जीवनावर शालेय पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रम असावा : भाईंच्या 102 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांचा सूर : गुणवंतांची केली शर्करातुला

नांदेड : मराठवाडा मुक्ती संग्रामातील थोर सेनानी , पाच वेळा आमदार, एक वेळा खासदार राहिलेले मराठवाड्यातील मुलुख मैदानी तोफ, गुराखी गडाची स्थापना करणारे बहुजन नेतृत्व भाई डॉक्टर केशवराव धोंडगे यांच्या जीवन कार्यावर शालेय पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रमासाठी पाठ असावा आणि यासाठी बालभारतीने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा अनेक मान्यवरांनी व्यक्त केली. सोनखेड येथील श्री शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या भाईंच्या 102 व्या जयंतीनिमित्त ते बोलत होते . यावेळी दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांची शर्करातुला करत त्यांचा गौरवही करण्यात आला.भाई केशवराव धोंडगे यांच्या ग्रंथांची ग्रंथ दिंडी काढून मान्यवरांचे आगळे वेगळे स्वागत करण्यात आले.
लोहा कंधार तालुक्यातून उदयास आलेले तत्कालीन नेतृत्व , मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यात मोठे योगदान देणारे भाई केशवराव धोंडगे यांच्या मातोश्री मुक्ताई धोंडगे यांनी तळागाळातील आणि शोषित ,पिढीत जनतेच्या मुलांना याच भागात शिक्षण मिळावे यासाठी शालेय संस्था स्थापन करण्यासाठी भाई केशवराव धोंडगे यांना सूचित केले होते .

मातोश्रीचे आदेश पळत भाई केशवराव धोंडगे यांनी लोहा कंधार तालुक्यातील अनेक वाडी तांड्यांवर शिक्षणाची ज्योत पेटवली . शिक्षणाचे जाळे ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत विनानाऱ्या भाईंनी पाच वेळा विधानसभा आणि एक वेळा लोकसभा अशा निवडणुका जिंकल्या. शेतकरी , शेतमजूर, शोषित, पीडित, वंचितांचा आवाज म्हणून भाईंना उभा महाराष्ट्र ओळखतो . तब्बल 101 वर्षाचे आयुष्य लाभलेल्या या थोर स्वातंत्र्यसेनानीने अखेरचा श्वास घेतला मात्र कार्यकर्तुत्वाच्या रूपाने ते आजही आपल्या सर्वांमध्ये आहेत.

 

भाई केशवराव धोंडगे यांचा सामाजिक, राजकीय ,सांस्कृतिक, कृषी ,साहित्य, पत्रकारिता अधिक क्षेत्रातील असलेले योगदान आगामी पिढ्यांना माहीत व्हावे, त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव आणि प्रेरणा येत्या पिढ्यांना मिळावी यासाठी शालेय पाठ्यपुस्तकात त्यांच्या जीवनावरील अभ्यासक्रमाचा समावेश करावा यासाठी बालभारतीने पुढाकार घ्यावा असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. सोनखेड येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या 102 व्या जयंती सोहळ्यात गुणवंतांचा सत्कार आणि शर्करातुलाही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली .
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सचिव तथा पत्रकार राम तरटे म्हणाले की, माजी आमदार, माजी खासदार भाई डॉक्टर केशवराव धोंडगे यांनी तत्कालीन परिस्थितीत उभारलेल्या शिक्षण संस्थांचे रोपटे आता वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. या महाराष्ट्राला असंख्य अधिकारी ,कर्मचारी आणि सुजाण विद्यार्थी, नागरिक देणाऱ्या श्री शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आता भविष्यातील उत्तम नागरिक, यशस्वी अधिकारी बनण्यासाठी प्रयत्न करावेत. आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून अभ्यास करावा, भाईंच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी हीच सर्वोत्तम संधी आहे . त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्यासाठी उभारलेल्या शिक्षण संस्थेच्या संधीचे सोने करावे असेही ते म्हणाले.

 

शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष बाबाराव भगवानराव देशमुख यांनी कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप केला . तत्पूर्वी प्रा. डॉ. धनंजय माणिकराव पवार यांनी मनोगत व्यक्त करताना भाईनी उभारलेल्या शैक्षणिक संस्था आणि विधिमंडळातील लोकसभेतील त्यांच्या कर्तृत्वाची यावेळी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबाराव देशमुख यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे डॉ.पंजाबराव देशमुख, पत्रकार राम तरटे , केरबाजी आठवडे, प्राचार्य पवळे बी.के. उपप्राचार्य पी. एल. येसलवाड , ईश्वर शेटे, मधुकर वानखेडे, प्रा. सुधीर कदम, प्रा. राजेश ढवळे, सरपंच सुनील मोरे, प्रा. भास्कर मोरे , सुत्रसंचलन संतोष बोडावाड, आभार प्रा.राजेंद्र पानसरे, पत्रकार कमलाकर बिरादार पाटील, पत्रकार प्रदीप घुगे, पत्रकार यशपाल भोसले आदींची यावेळी उपस्थित होती.यावेळी सर्व शालेय समिती सदस्य, सोनखेड परिसरातील बहुसंख्य पालक, सरपंच, चेअरमन, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *