ज्ञान हीच शक्ती’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रणालीवर आधारित हे ज्ञानस्मारक.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हे ऐरोली, नवी मुंबई येथील स्मारक आहे. हे स्मारक नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, उभारण्यात आले आहे. स्मारकाच्या मुख्य इमारतीमध्ये 49 मीटर उंचीचा डोम उभारण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्वत्तेचे प्रतीक आहेत. यामुळे डोमचा आकार पेनाच्या नीबप्रमाणे व उमलत्या कमळाप्रमाणे ठेवण्यात आला आहे.
महानगरपालिकेने ऐरोली सेक्टर 15 मध्ये हे स्मारक उभारण्याचे काम इस. 06 एप्रिल 2011 रोजी सुरू केले. इस. 01 नोव्हेंबर 2014 रोजी. लोकार्पन सोहळा देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री मा. शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हे स्मारक अत्यंत देखणे आणि अनेकांना प्रेरणा घेऊन जाणारे ठरत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी याठिकाणी माहिती संकलित करून प्रदर्शित करण्यात आली आहे.
आणि भारत देशातील व संपूर्ण जगातील कोणत्याही व्यक्तीला हे ठिकाण मोफत स्वरूपात पाहण्यात येत आहे याचा अधिक आनंद होत आहे. स्मारकाच्या मुख्य इमारतीमध्ये प्रवेश केल्यानंतर आनापान सक्ती ध्यानसाधना करण्यात आली. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास चित्रीकरणाच्या माध्यमातून पाहण्यात आला हे सर्व पाहून अतिशय मनाला आनंद आणि अधिक प्रेरणा घेणारा आजचा दिवस ठरला.
स्मारकाला भेटी देणाऱ्या नामांकित विचारवंत, साहित्यिक, व्याख्यात्यांनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी ‘ज्ञान हीच शक्ती’ या डॉ. बाबासाहेबांच्या विचार प्रणालीवर आधारित हे ज्ञानस्मारक असल्याचे अभिप्राय नोंदविलेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या तसेच त्यांच्या चरित्रावर व विचांरावर आधारित पुस्तकांप्रमाणेच येथे आंबेडकरी विचारधारा तसेच महनीय व्यक्तिमत्त्वांवरील पाच हजारांहून अधिक पुस्तकांनी समृद्ध ग्रंथालय असून त्यामध्ये ऑडिओ व्हिज्युअल सुविधांनी परिपूर्ण ई-लायब्ररी आहे.
या ग्रंथालयातून अभ्यासक व वाचकांना विचारांचा खजिना विनामूल्य उपलब्ध आहे. ही सुद्धा एक अनमोल ठेवा आहे. डॉ. बाबासाहेबांचे जीवनचरित्र दुर्मिळ छायाचित्रांतून मांडणारे विशेष दालन हे स्मारकाचे आकर्षण असून या माध्यमातून बाबासाहेबांचा जीवनप्रवास उलगडतो. येथे असलेल्या आभासी चलचित्र प्रणालीद्वारे बाबासाहेबांचे प्रत्यक्ष भाषण ऐकण्याची होलोग्राफिक प्रेझेंटेशन शोच्या माध्यमातून मिळणारी सुसंधी भारावून टाकते, अशी भावना तीथे भेट देणाऱ्या प्रत्येकाने वेळोवेळी व्यक्त केल्या आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या drambedkarsmark या स्वतंत्र फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, युट्युब अशा सोशल मीडीया पेजला जगभरातून असंख्य नागरिकांचे लाईक्स आणि कमेंट्स प्राप्त होत आहेत.
या स्मारकाचे वेगळेपण त्याठिकाणी भेटी देणाऱ्या नागरिकांना मनापासून जाणवत असून त्यांच्यामार्फत इतरांपर्यंत या स्मारकाची माहिती पोहचत आहे. नव्या पिढीमध्ये अर्थात मुलांमध्ये ज्ञान संपादनाचे विचार रुजावेत, याकरिता पालक पुढाकार घेऊन आपल्या मुलांना या स्मारकाची भेट घडवित आहेत. म्हणून ‘ज्ञान हीच शक्ती’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रणालीवर आधारित हे ज्ञानस्मारक. असंच म्हणावं लागेल.
– सोनू दरेगावकर, नांदेड
दिनांक: 22 जानेवारी 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *