मुखेड: मार्क्सवाद आणि पुढे आंबेडकरी विचारांचे समाजात बीज पेरणारे महत्त्वपूर्ण कार्य लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या समाजवादी विचारातून आणि त्यांच्या साहित्यातून केले. हे त्यांचे विचार समता, स्वातंत्र्य आणि बंधुता निर्माण करणारे आणि परिवर्तनाला दिशा देणारे क्रांतिकारी विचार होते. पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे, असा साम्यवाद पेरणारे अण्णाभाऊ साठे आपल्या लेखणीने व विचाराने कर्तुत्वान महापुरुष ठरतात, असे महत्त्वपूर्ण विवेचन प्राचार्य डॉ. मनोहर तोटरे यांनी आपल्या भाषणात मांडले.
येथील शाहीर अण्णा भाऊ साठे महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या महाविद्यालयीन कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपातून प्राचार्य मनोहर तोटरे बोलत होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संजीव डोईबळे ,मराठी विभाग प्रमुख डॉ. राम धारासुरकर, प्रा.डा. केशव पाटील, प्रा. बसवेश्वर स्वामी, डॉ .अशोक अंधारे, डॉ. जी रमणा रेड्डी, स्वारातीम विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. सोपान ढवळे, डॉ. विजय गोरगिळे, हिंदी विभाग प्रमुख महावीर उदगीरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवन आणि सामाजिक कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राम धारासूरकर यांनी केले.
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्ताने मराठी विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी तयार केलेल्या ,”शब्द शाहिरी” विशेषांकाचे विमोचन यास प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी तयार केलेल्या विशेषांकाचे कौतुक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तोटरे म्हणाले की, आपला मराठी विभाग हा नेहमीच सांस्कृतिक आणि साहित्य विचारपीठावरील कार्यक्रम घेण्यास अग्रेसर असतो. विद्यार्थ्यांमध्ये वाचन,लेखन आणि श्रवण या गोष्टीची आवड लागावी म्हणून या कार्यक्रमातून त्यांना प्रेरणा मिळते. त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा म्हणून असे उपक्रम राबवणे महाविद्यालयीन जीवनात महत्त्वाचे असते. म्हणून मी मराठी विभागाचे व विद्यार्थी विद्यार्थिनींचे कौतुक करतो.
याप्रसंगी प्रा. मष्णाजी सगरोळे, डॉ. संजय कल्याणकर, डॉ. माधव मंदेवाड यांची उपस्थिती होती. शब्द शाहिरी विशेषांक तयार करण्यासाठी कु. चेतना तमशेटे, कु. शालिनी घायाळे, कु. यमुना नाईकवाड या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नारायण गवळे तर आभार नितीन पवार या विद्यार्थ्यांनी मांडले. कार्यक्रमास प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.