*बळीराजांचे हौसी मर्दानी खेळ म्हणजे बैलांचा शंकर पट …! *हवेच्या वेगाने धावल्या बैलजोडी; ३ सेकंद ३८ पाॅइंटमध्ये अंतर सर*
*कंधार प्रतिनिधी संतोष कांबळे*
महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीची ओळख दर्शविणारा व बळीराजा शेतकरी बांधवांचा जिव्हाळ्याचा खेळ म्हणजे शंकरपट.
बैलगाडा हा मातीतला खेळ हजारो वर्षांपासून जपला गेला आहे. पण गेले काही वर्षे शंकरपट होऊ शकले नव्हते. पण माळेगावात दि.४ ला दुपारपासून ५८ जोडीनी आपले कसब दाखविले. सायंकाळी साडेपाच पर्यंत हा थरार सुरू होता.
शेती,मातीत रमणाऱ्या शेतकऱ्यांचा माळेगावचा शंकरपट म्हणजे जीव की प्राण. न्यायालयाच्या निर्णयानंतर गेल्या वर्षीपासून पुन्हा बैलगाड्यांच्या शर्यतीला सुरुवात झाली आहे. बंदी उठल्यावरचा माळेगावचा दुसरा शंकरपट. गर्दीचे सर्व उच्चांक मोडत माळेगावात मराठवाडा, विदर्भातील तसेच बाजूच्या राज्यातील शेतकऱ्यांनी या शंकरपाटासाठी गर्दी केली होती. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून यासाठी बैलजोडी आल्या होत्या. त्यामुळे यंदाचा शंकरपट अतिशय चुरशीचा गर्दीचा आणि उत्कंठेचा ठरला आहे.
विविध रंगी, देखण्या आणि चपळ बैलजोड्या हवेच्या वेगाने निर्धारित अंतर पार करीत होत्या. त्यांच्या धावण्याचा वेग सुसाट वाऱ्यासारखा होता. डोळ्याची पापणीही लवणार नाही इतक्या वेगाने ती जोडी निर्धारित अंतर पार करीत होती. हा थरारक अनुभव आपल्या डोळ्यांत साठविण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. प्रत्येक क्षणाला ही स्पर्धा उत्कंठा वाढविणारी होता.शंकर पटाच्या गर्दीने हा खेळ तुफान लोकप्रिय असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
तत्पूर्वी शंकर पट या कार्यक्रमाचे उद्घाटन आ. आनंदराव बोंढारकर यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, पोलीस उपविभागीय अधिकारी अश्विनी जगताप, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, नरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडीलवार, सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. दिनेश महेर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डाॅ. प्रवीणकुमार घुले, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, सरपंच हनुमंत धुळगंडे, गट विकास अधिकारी दशरथ आडेराघो, पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव शिंदे, अधिकारी धनंजय देशपांडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी खंडोबाच्या प्रतिमेचे पूजन करून दुपारी एक वाजता शंकरपट शर्यतीला सुरुवात झाली. या शर्यतीसाठी महाराष्ट्रातील नांदेड, पालम, गंगाखेड, पूर्णा, परभणी, लातूर, अहमदपुर, हिंगोली,यवतमाळ वाशिम आदी ठिकाणांहून ५८ बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. वेगवान धावणाऱ्या बैलजोड्यांनी उपस्थित लाखो प्रेक्षकांना अक्षरशः थक्क केले. शेतकऱ्यांसाठी ही स्पर्धा केवळ मनोरंजन नाही तर त्यांच्या मेहनतीचा व बैलांवरील प्रेमाचा सन्मान असल्याचे यावेळी एका शेतकऱ्यांनी बोलून दाखवले. पंच म्हणून जनार्दन मंदाडे व नागेश मंदाडे यांनी काम पाहिले.
– लाईन क्लिअर…जोडी सोडा… जोडी मालकासाठी खुशखबर… तीन सेकंद ३८ पाँईट… आणि वायुगतीने… विक्रमी वेळेत अंतर पार… पाठोपाठ शेतकऱ्यांच्या टाळ्या शिट्ट्या… अशा माळेगावच्या माळरानावरील धावत्या समालोचनात ५८ बैल जोड्यांनी डोळ्यांचे पारणे फेडणारा थरार रचला. शंकर पटाच्या गर्दीने हा खेळ तुफान लोकप्रिय असल्याचे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले.
*शंकरपटाची प्रक्रिया*
शर्यतीसाठी मैदानावर विशिष्ट अंतरावर दोन खांब लावले जातात. त्यावर धागे बांधलेले असतात. पहिला धागा तोडला की, वेळ मोजणारे घड्याळ सुरू होते आणि दुसरा धागा तोडला की वेळ थांबते. या दरम्यानची वेळ नोंदवली जाते. ज्या जोडीने सर्वात कमी वेळात अंतर पूर्ण केले ती जोडी विजयी ठरते.