नांदेड -माणसांच्या मनाला प्रकाश वाटा दाखविण्याचं काम व्याख्यानमाला करतात. विचारांची शेती याद्वारे केली जाते. मनाचे सौंदर्य वाढविण्याचे काम यातून घडत म्हणून व्याख्यानमाला महत्त्वाच्या आहेत. ज्यांच्या नावाने ही व्याख्यानमाला चालते ते प्रा. सुग्राम पुल्ले हे विद्यार्थी प्रिय गुरुजी होते. संतत्वाची लक्षणे त्यांच्यापासी होती, अत्यंत मितभाषी असं व्यक्तिमत्व होते. त्यांच्या विचारांचा जागर हे प्रतिष्ठान घालते आहे हे कौतुकास्पद आहे.नातेसंबंधात प्रेमाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.आज घर मुकी होत चालली आहेत. संवाद खुंटलाय, माणसे फेसबुक व व्हाट्सअप वरून बोलताना दिसतात पण प्रत्यक्षात मात्र बोलत नाहीत. आपण साधनांच्या आहारी जात आहोत.
कुटुंब आणि आदर्श समाज व्यवस्था टिकविण्यासाठी धनापेक्षा आपण नात्यांना अधिक महत्त्व दिले पाहिजे. नाती जपून ठेवा अंधार फार झाला असेही त्यांनी सांगितले. संस्कारहीन पीढीमुळे आई-वडिलांची कशी दुर्दशा होत आहे हे सांगताना त्यांनी काही उदाहरणे दिली जी ऐकुण बरेच श्रोते भाऊक झाले होते. नात्यांमध्ये प्रतिकारापेक्षा प्रतिसादाला महत्त्व आहे असे प्रतिपादन ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान )महाविद्यालय,वसंतनगर ता.मुखेड येथील लेखक व प्रसिद्ध वक्ते डॉ. रामकृष्ण बदने यांनी प्रा. सुग्राम पुल्ले स्मृती व्याख्यानमाला व पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी नांदेड येथे ‘ गुंफू संस्काराचे मोती जपू प्रेमाच्या नाती’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.
यावेळी युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक देविदास सौदागर यांचा सुग्राम पुल्ले साहित्य पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की संवेदनशील समाज निर्मितीसाठी वाचन आवश्यक आहे, माणूस अभिव्यक्तीसाठी धडपडत असतो, कधी बोलण्यातून तर कधी लिहिण्यातून तो अभिव्यक्त होत असतो, त्यामुळे व्यक्त होणे ही माणसाची गरज असते. आज विविध प्रश्नांच्या गुंतागुंतीत समाज अडकला असून माणसाची वेदना समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.वाचनातून माणूस घडत जातो,मी वाचत गेलो म्हणून इथपर्यंत पोहोचलो.
अध्यक्षीय समारोप करताना मनोहर आयलाने म्हणाले की समाजात नात्याची विण उसवत आहे,अस्या काळात व्याख्यानमालांची नितांत गरज आहे.माणसा माणसांच्या नात्यात माणुसकीचा ओलावा असेल तर समाज सुंदर होतो. वाचनातून व भाषणातून चांगले विचार स्वीकारले पाहिजेत. त्यामधूनच आपल्या जीवनाचा विकास साधता येतो
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. कमलाकर चव्हाण यांनी केले, प्रमुख पाहुण्यांचा परिचय विजयकुमार बेंबडे यांनी करून दिला. मानपत्राचे वाचन डॉ. विश्वाधर देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.ओमकार चिंचोले यांनी तर आभार प्रतिष्ठा चे सचिव डाॅ.जितेंद्र पुल्ले यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्षा सौ. मनीषा पुल्ले, अनंत रेड्डी भुरकापल्ले, डॉ.शिवसांब कापसे, लिंगराम हंडरगुळे, सुनील मुसने आदिनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमासाठी डॉ.डी.एन मोरे,डॉ.मा.मा. जाधव, प्राचार्य के. राजकुमार, प्रसिद्ध कादंबरीकार सुरेंद्र पाटील, डॉ. ज्ञानदेव राऊत, प्रा.नारायण शिंदे,डाॅ. व्यंकटी पावडे,डॉ. संजय जगताप,डाॅ. विठ्ठल जंबाले डाॅ. व्यंकट विळेगावे,डॉ. आर.एन.गंगासागरे, डॉ. प्रकाश भांगे,डॉ.विजय पवार, डॉ. यशवंते,डाॅ. श्रीनिवास पवार,प्रा.सुभाष कनकुटे, प्रा. संजय पाटील,जनार्दन मुंढे,प्रा.डाॅ माने आदिसह साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.