ग्रामपंचायत निवडणूक निकालाचे पडघम : भाग एक

राज्यातील सर्वच ठिकाणी जिथे जिथे म्हणून निवडणूक होती त्या सर्वच ठिकाणी निर्धारित केलेल्या दिवसाप्रमाणे निकाल लागले. हे निकाल तरुणाईला स्वीकारणारे आणि प्रस्थापितांना जितके नाकारणारे होते तितकेच ते धक्कादायकही होते. दिग्गजांच्या हातातील सत्ता नवख्यानी हिसकावून घ्यावी आणि तुम्हाला ग्रामपंचायतही स्वत: कडे राखता येऊ नये ही लाजीरवाणी गोष्ट आहे असे ज्यांना वाटले त्या स्तरातील लोकांनी मोठमोठ्या नेत्यांसमोर एकप्रकाचे प्रश्नचिन्ह उभे मात्र केले होते. अनेक ठिकाणी दिग्गजांचा पराभव झालेला आहे. लोकांनी आधीच्या सत्ताधाऱ्यांना नाकारले आहे. ते इतके की सत्ताधारी पॅनलचा पुरता धुव्वा उडविला आहे. काही ठिकाणी निर्विवाद बहुमत सिद्ध करीत तरुणाईने गावपुढारीपण ताब्यात घेतले आहे.‌ यातून तरूणांचा राजकारणातील शिरकाव केवळ आशादायकच नाही तर पुढील भविष्यातल्या नव्या नेतृत्वाचा उदय होऊ शकतो

राजकारणात आपल्याला नेहमीच प्रौढ माणसे दिसतात. तरुणांना किंवा नव्या चेहऱ्यांना संधीच दिली जात नव्हती. परंतु या निवडणुकीत सुरुवातीपासून तरुणाईने एक नवे वातावरण तयार केले होते. सोशल मीडियापासून ते प्रत्यक्षात अर्ज दाखल करेपर्यंत तरुणाईचा उत्साह कायम होता. हे तरुणांनी गांभीर्याने घेतले होते. तसेच प्रौढांनीही पाठिंबा दिला होता. काही ठिकाणी अपवाद वगळता ज्या पद्धतीने नव्या चेहऱ्यांना संधी दिली गेली तद्वतच प्रस्थापित पुढाऱ्यांसह सतत सत्तेतच राहणाऱ्यांना या निवडणुकांनी मोठी चपराकच दिली आहे. अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल हे यंदाच्या ग्रामपंचायत निवडणूक निकालाचे वैशिष्ट्ये होते.

राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा करण्यात येत आहे. या निवडणुकीत भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. तर महाविकास आघाडीतील पक्षांनाही काही ठिकाणी धक्का बसला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीत प्रस्थापितांना धक्का देत नवख्यांच्या हाती सत्ता आल्याचे पाहायला मिळाले.

कोरोना महामारीनंतर जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका अनेक अर्थाने महत्वाच्या होत्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत स्थापन केलेल्या महाविकास आघाडीने या ग्रामपंचायात निवडणुका एकत्रित लढल्या. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी आपला मतदारसंघ मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका महत्वाच्या असतात. त्यामुळे सर्वच नेत्यांनी आपापली ताकद लावली होती.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात सत्तारूढ झालेल्या शिवसेनेने ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सत्ता काबीज केलीय. कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर ग्रामपंचायत जिंकून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना धक्का दिलाय तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी शिरकाव केलाय. राज्यातील सत्तेचा खालपर्यंत झिरपत जाणारा प्रभाव मागील वेळी जसा भाजपच्या बाबतीत पाहायला मिळाला होता तसा तो यावेळी शिवसेनेच्या बाबतीत पाहायला मिळाला.

कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर या आपल्या मूळ गावातील ग्रामपंचायतीची निवडणूक आपल्यासाठी प्रतिष्ठेची आहे हे ओळखून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वतः त्यामध्ये लक्ष घातलं होतं. इतकंच काय त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना हाताशी देखील धरलं होतं. पण शिवसेनेच्या प्रकाश अबिटकरांनी इथं बाजी मारली. पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर या पुणे-बँगलोर महामार्गालगत असल्याने महत्व प्राप्त झालेल्या गावातील सत्ताही शिवसेनेने राष्ट्रवादीकडून खेचून घेतली. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे यांच्या पॅनेलने इथं 11 पैकी नऊ जागांवर विजय मिळवला आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून नांदेडची ओळख आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांचं वर्चस्व जिल्ह्यावर आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व अनेक ग्रामपंचायतीवर सिद्ध झालंय तर भाजपची फारशी सरशी या निवडणुकीत झाल्याचे दिसून येत नाही. लोहा कंधार मतदार संघातील 159 ग्रामपंचायतपैकी 33 ग्रामपंचायतीवर भाजपने सत्ता संपादन केली आहे. परंतु जिल्ह्यातील इतर 14 तालुक्यात भारतीय जनता पार्टी आपली जादू दाखवू शकली नाही. त्यामुळे भाजपला तोंडघशी पडून महाविकास आघाडीने मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात मुसंडी मारली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील उत्तर रत्नागिरीतील चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, मंडणगड या पाच तालुक्यापैकी दोन तालुक्यात महत्वाची लढत होती. यापैकी चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांचे गाव सावर्डे. या गावात 17 उमेदवारांपैकी 8 बिनविरोध तर 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. शेखर निकम यांच्या पॅनल चे 9 च्या 9 उमेदवार निवडून आले. पुन्हां एकदा शेखर निकम आपल्या गावात विजयाचा गड राखण्यात यशस्वी झाले आहेत तर माजी मंत्री आणि सध्याचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचे गाव तुरंबव या गावात त्यांचे सख्ये बंधू सुनिल जाधव यांच्या विरोधात त्यांच्याच चुलत भावाचा मुलगा स्वप्नील जाधव हा निवडणुकीच्या रिंगणात उभा होता. काका पुतण्याच्या लढाईत काकांनी बाजी मारली तर पुतण्याला पराभव पत्करावा लागला.

सांगली जिल्ह्यात 152 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीमध्ये जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झाली, काँग्रेस बरोबर शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. खानापूर-आटपाडी मतदारसंघात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या गटाला मोठे यश मिळाले आहे. तर कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या मतदार संघात काँग्रेसला देखील चांगले यश मिळाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपने आपले वर्चस्व कायम राखले आहे. भाजपकडे 45 ग्रामपंचायती तर सेनेकडे 21 ग्रामपंचायती आल्या आहेत. राष्ट्रवादीने 1 आणि गाव पॅनेलने 3 ग्रामपंचायती राखल्या आहेत. जिल्ह्यात राणेंनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. मालवणमध्ये आमदार वैभव नाईक यांना तर सावंतवाडी मध्ये माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आमदार निलंय नाईक यांच्या गटाचे वर्चस्व. अनिल नाईक यांच्या नेतृत्वात 7 पैकी 7 जागांवर विजय. 7 पैकी 6 जागा बिनविरोध झाल्या होत्या. मात्र, 1 जागेसाठी निवडणूक लागली ती 1 जागाही आमदार निलंय नाईक यांच्या गटाकडे आहे.

हिंगोली जिल्ह्यात आज एकुण 462 ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी पार पडली. ज्यात अनेक प्रस्थापित नेत्यांना गावकऱ्यांनी धक्के दिलेत. ज्यात महत्वाचे म्हणजे वसमत तालुक्यातील शिवसेनेचे माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या पांगरा शिंदे गावात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राजु नवघरे व माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्या पॅनलचा भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अवधुत शिंदे यांच्या पॅनलने 11 पैकी 9 जागांवर विजय मिळवत वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे या दोन्ही दिग्गज नेत्यांना मोठा धक्का बसलाय. शिवाय शिवसेनेचे नेते तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ज्या बळसोंड गावात सेनेच्या उमेदवारांचा प्रचार केला त्याठिकाणीही शिवसेनेला एकही जागा मिळवता आली नाही. तिथेही भाजपच्या पॅनलने 13 पैकी 13 जागा जिंकल्यात. तसेच शिवसेनेचे नेते माजी खासदार शिवाजी माने यांच्या कान्हेंगावातही त्यांना केवळ 2 जागा मिळाल्यात इथल्या श्रीकांत वाघमारे यांनी 5 जागा जिंकुन मानेंच्या 25 ते 30 वर्षांपासूनच्या सत्तेला छेद दिलाय इथे शिवाजी माने यांचे पुतणे दत्ता माने यांचे पॅनल उभे होते मात्र त्यांना केवळ 2 च जागा मिळाल्या आहेत.

बारामतीत सर्वच्या सर्व 49 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राखण्यात यशस्वी. तर दोन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. या निकालाने संपूर्ण बारामतीत जल्लोष साजरा करण्यात येतोय. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून राष्ट्रवादीने आघाडी घेतली होती ती शेवटपर्यंत कायम ठेवली. विरोधकांना बारामतीत एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. या निकालाने बारामती तालुका राष्ट्रवादी काँगेसचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

सातारा शहरालगत असलेल्या आणि खासदार उदयनराजेंनी दत्तक घेतलेल्या कोंडवे ग्रामपंचायतीत उदयनराजे गटाला 13 पैकी केवळ 3 जागा तर आमदार शिवेंद्रराजे गटाला 10 जागेवर विजय मिळवला आहे.

अमरावतीत काँग्रेसने ग्रामीण भागात आपले वर्चस्व प्रस्थापित करीत 553 पैकी 341 ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकविल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. अमरावती तालुक्यात 44 पैकी 20 काँग्रेस , भातकुली तालुक्यात 35 पैकी 21 काँग्रेस, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 47 पैकी 30 काँग्रेस, दर्यापूर तालुक्यात 50 पैकी 35 काँग्रेस, अंजनगाव सुर्जी तालुक्यात 34 पैकी 25 काँग्रेस, तिवसा तालुक्यात 28 पैकी 23 काँग्रेस, चांदुर रेल्वे तालुक्यात 29 पैकी 17 काँग्रेस, धामणगाव रेल्वे तालुक्यातील 53 पैकी 31 काँग्रेस, अचलपूर तालुक्यात 44 पैकी 27 काँग्रेस, चांदूरबाजार तालुक्यात 41 पैकी 28 काँग्रेस, मोर्शी तालुक्यात एकूण 40 पैकी 25 काँग्रेस, वरुड तालुक्यात 41 पैकी 30 काँग्रेस, धारणी तालुक्यात 34 पैकी 14 काँग्रेस, चिखलदरा तालुक्यात 23 पैकी 15 काँग्रेस, अशा 341 ग्रामपंचायतीवर जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

वाशिम जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर झाला असून, अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रस्थापितांना नाकारत मतदारांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिली. ५० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये मतदारांनी सत्तांतर करीत सत्ताधाऱ्यांना चांगलाच हादरा दिला.
जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्याने वाशिम तालुक्यातील २४, रिसोड ३४, मालेगाव ३०, मंगरुळपीर २५, कारंजा २८ आणि मानोरा तालुक्यातील २२ अशा एकूण १६३ ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. ११ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने १५२ ग्रामपंचायतींच्या १२३३ जागांसाठी ३२२६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. १५ जानेवारी रोजी एकूण ५३९ केंद्रांत दोन लाख ८८ हजार ६९१ पैकी दोन लाख १९ हजार ३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजतापासून तालुकास्तरीय सहा केंद्रांत मतमोजणीला सुरुवात झाली. या निकालाने अनेक दिग्गजांना हादरा देत नवीन चेहऱ्यांना संधी दिली. काही दिग्गजांनी गतवेळच्या पराभवाचा वचपा काढत ग्रामपंचायतीची सत्ता पुन्हा ताब्यात घेतली.

अकाेला ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले असून गावपातळीवर प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत अकाेल्यातील आमदारांनी आपल्या गावात आपले वर्चस्व कायम ठेवल्याचे समाेर आले आहे. दुसरीकडे ग्रामीण विकासाचे केंद्र असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या गावात मात्र त्यांच्या पॅनेलचा धुव्वा उडाला.

अकाेला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभा भाेजने या भांबेरी या गावातील रहिवासी आहेत. तेल्हारा तालुक्यात वंचित व भाजप यांच्यामध्ये वर्चस्वाची लढाई असते. यावेळी भाेजने यांच्या पॅनेलचा धुव्वा उडाला असून केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. केंद्रीय राज्यमंत्री संजय धाेत्रे व अकाेला पूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांच्या पळसाे बढे या गावात वंचित बहुजन आघाडीचे ९ उमेदवार विजयी झाले तर भाजपचे चार उमेदवार जिंकले, मात्र येथील सत्ता ही तडजाेडीनेच हाेणार असल्याचीच चर्चा आहे. बाळापूर मतदारसंघाचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या सस्ती या गावात त्यांनी एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. अकाेट तालुक्यातील कुटासा ग्रामपंचायतमध्ये आमदार अमाेल मिटकरी हे आमदार झाल्यानंतरच्या निवडणुकीचे नेतृत्व केले त्यामध्ये त्यांना घवघवीत यश मिळाले. बाळापूर तालुक्यातील निमकर्दा गावात माजी आ. नारायणराव गव्हाणकर यांच्या पॅनेलचा धुव्वा उडवित तालुका काँग्रेस अध्यक्ष अजय ताथोड यांच्या पॅनेलने ९ पैकी ९ जागी विजयी मिळविला. अकाेला पंचायत समितीचे सभापती संपतराव नागे यांच्या पॅनेलचा पैलपाडा ग्रामपंचायतमध्ये धुवा उडवला. मूर्तिजापूर कुरुम येथून पंचायत समिती माजी उपसभापती व माजी सरपंच उमेश मडगे पराभूत, भटोरी माजी पंचायत समिती उपसभापती विनायकराव कावरे यांचे पुत्र शेखर कावरे पराभूत, मूर्तिजापूर तालुक्यातील भटोरी ग्रामपंचायत राष्ट्रवादी ओबीसी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुषमा कावरे पराभूत झाल्या आहेत

रायगड जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने सर्वाधिक २२ ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित केले. राष्ट्रवादी काॅंग्रेसने १७, शिवसेना १३, शेकाप आणि भाजप प्रत्येकी १२, भाजप-शिवसेना आघाडी ६, विकास पॅनेल ३, काॅंग्रेस २ आणि एक अपक्ष असे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. विजयी उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळत जल्लाेष साजरा केला. १५ जानेवारी राेजी ७८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडली हाेती. तत्पूर्वी १० ग्रामपंचायती बिनविराेध झाल्या हाेत्या. मतमाेजणी सोमवारी सकाळी पार पडली. ग्रामीण भागामध्ये साेयीस्कर राजकारण करण्यात येते. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे.

जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींची निवडणूक एकत्रित लढण्यात आली. त्यामध्ये महाविकास आघाडाली इतरांपेक्षा घवघवीत यश मिळाले आहे, तर स्वतंत्रपणे लढलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसने १७ ग्रामपंचायींवर निर्विवाद सत्ता स्थापन केली आहे. शिवसेने १३, तर शेकाप आणि भाजप यांना प्रत्येकी १२ ग्रामपंचायती खिशात घातल्या आहेत. काॅंग्रेसला फक्त दाेनच ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित करता आले आहे. भाजप-शिवसेना आघाडीला ६, स्थानिक विकास पॅनेल ३ आणि एक अपक्ष असे राजकीय समीकरण स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सरपंच पदाचे आरक्षण निकालानंतर काढण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता सर्वांचेच लक्ष आरक्षण साेडतीकडे लागले आहे.

अलिबाग तालुक्यात ४ ग्रामपंचायतींत झालेल्या निवडणुकीत पेझारी, सासवणे आणि वाघोडे या ३ ग्रामपंचायतींवर शेकापने दणदणीत विजय मिळविला आहे, तर मानतर्फे झिराडमध्ये त्रिशंकू स्थिती आहे. त्यामुळे शेकापने आपला गड शाबूत ठेवल्याचे स्पष्ट झाले आह. तालुक्यातील मानतर्फे झिराड ग्रामपंचायतीमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. येथे शिवसेनेचे ५, शेकापचे ३ आणि काँग्रेसचे ३ उमेदवार निवडून आले, तर दुसरीकडे पेझारीमध्ये ९ पैकी ९ जागांवर दणदणीत विजय मिळवीत शेकापने निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. सासवणे ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी निवडणूक होती. यापैकी प्रभाग १ मधून भाग्यश्री सोमनाथ नाखवा या आधीच बिनविरोध निवडून आल्या आहेत, तर उर्वरित ८ जागांवर शेकापने आपले उमेदवार निवडून आणले आहेत. वाघोडे ग्रामपंचायतीच्या ९ जागांपैकी प्रभाग २ मधील आशिष नरेंद्र म्हात्रे हे बिनविरोध निवडून आले होते, तर उर्वरित ८ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. यापैकी ७ जागांवर शेकापने बाजी मारली असून, उर्वरित २ जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले.

शेकापचा बालेकिल्ला असलेल्या पेझारी ग्रामपंचायतीमध्ये पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या ग्रामपंचायतीमध्ये ९ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. या सर्वच्या सर्व जागांवर शेकापने उमेदवार निवडून आणले. मानतर्फे झिराड ही ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात होती. त्यामुळे शिवसेनेला टक्कर देण्यासाठी शेकापने चांगलाच जोर लावला होता. अपेक्षेप्रमाणे याठिकाणी अटीतटीची लढत झाली आहे. ११ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे ५ उमेदवार निवडून आले, तर काँग्रेस आणि शेकापचे प्रत्येकी ३ उमेदवार विजयी झाले. त्यामुळे याठिकाणी त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना विरुद्ध शेकाप अशा लढतीमध्ये काँग्रेसने ३ जागा निवडून आणल्याने सत्तेच्या चाव्या काँग्रेसच्या हातात गेल्या आहेत.

माणगाव – लोणेरे ग्रामपंचायतीच्या ११ जागांपैकी १० जागांवर शिवसेनेने आपला भगवा झेंडा फडकवण्याचा विक्रम केला आहे. लोणेरे ग्रामपंचायतीत शिवसेनेचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असून, शिवसेनेला लोणेरे ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात ठेवण्यात यश आले आहे. शिवसेना पुरस्कृत समर्थ विकास पॅनलला अभूतपूर्व यश मिळून अकरापैकी दहा उमेदवार विजयी होऊन शिवसैनिकांनी इतिहास घडविला आहे.

नेरळ – कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन विकास आघाडीने बाजी मारली आहे. ग्रामविकास आघाडी आणि परिवर्तन विकास आघाडी अशी लढत झाली. या लढतीमध्ये परिवर्तन विकास आघाडीचे ६ उमेदवार निवडून आल्याने अखेर पोशीर ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन घडले असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोशीर ग्रामपंचायतीमध्ये ११ जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात होते. यात चार प्रभागांतील ६ उमेदवार परिवर्तन विकास आघाडीचे तर ५ ग्रामविकास आघाडीचे विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे पोशीर ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्ष सोडून इतर सर्वच पक्षांचे दोन गट पाहायला मिळाले आणि शेतकरी कामगार पक्षाच्या एकीमुळेच हे परिवर्तन घडल्याचे बोलले जात आहे.

ठाणे जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या आज जाहीर झालेल्या निकालात संमिश्र काैल मिळाला आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. दाेन्ही पक्षांनी सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला असला तरी सरपंचांच्या निवडणुकीनंतरच खरे चित्र स्पष्ट हाेणार आहे.

जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल साेमवारी जाहीर झाला. भिवंडी तालुक्यात झालेल्या ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपने ३० जागा जिंकल्याचा, तर शिवसेनेने २० जागा जिंकल्याचा दावा केला आहे. तर तीन ग्रामपंचायती बिनविराेध झाल्या हाेत्या. भिवंडीत ५० वर्षांची सत्ता पालटवून भाजपने सर्व १७ उमेदवार निवडून आणले आहेत. शहापूर तालुक्यात झालेल्या ४४ ग्रामपंचायतींपैकी ३७ ग्रामपंचायतींवर भाजपने, तर शिवसेनेने ३१ ग्रामपंचायती ताब्यात घेतल्याचा दावा केला. विशेष म्हणजे पाच ग्रामपंचायती बिनविराेध झाल्या हाेत्या. त्यामुळे खरे सत्ताधारी हे सरपंचांच्या निवडणुकीनंतरच ठरणार आहेत. शहापूरमध्ये झालेल्या पाच ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीने तीन, तर शिवसेनेने चार ग्रामपंचायतींवर दावा केला आहे.

अंबरनाथ तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींपैकी ११ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व असून भाजप आठ जागांवर राष्ट्रवादी ४ जागांवर, मनसे एक जागेवर तर महाविकास आघाडी तीन जागांवर विजयी झाली आहे. अंबरनाथमधील काकाेळे ग्रामपंचायतीत मनसेने शिवसेनेला धूळ चारत बाजी मारली.

पालघरमध्ये स्थानिक आघाडीने बाजी मारत जिल्ह्यातील दोन तालुक्यांतील तीन ग्रामपंचायतींच्या पार पडलेल्या निवडणुकांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला निर्विवाद वर्चस्व गाजवता आलेले नाही. मात्र शिवसेना एक, बहुजन विकास आघाडी एक आणि एका ठिकाणी स्थानिक आघाडीने बाजी मारली आहे. पालघर तालुक्यातील सागावे ग्रामपंचायतीत शिवसेनेने बाजी मारली आहे, तर वसई तालुक्यातील पाली ग्रामपंचायतीमध्ये बविआचे वर्चस्व राहिले आहे. तर वसईतील सत्पाळ्यात ग्रामसमृद्धी पॅनेलने अन्य पक्षांवर मात करीत विजय मिळ‌वला आहे. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फारसे समाधाकारक यश मि‌ळवता आलेले नाही. पालघरमधील सागावे येथे शिवसेनापुरस्कृत युवा परिवर्तन पॅनलने ७ पैकी ४ जागांवर वर्चस्व मिळवीत भगवा फडकवला. तर विरोधी युवा परिवर्तन पॅनलला ३ जागांवर समाधान मानावे लागले.

सत्पाळा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसमृद्धी पॅनेलने ११ जागांपैकी ९ जागा जिंकत बाजी मारली असून, यामध्ये बहुजन विकास आघाडीला दोन जागांवरच समाधान मानावे लागले आहे.

  • तर पालीत मात्र बहुजन विकास आघाडीची सरशी झाली असून ४ पैकी ३ जागा मिळवल्या आहेत, तर एका जागेवर शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे.

ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी हाती आले. अनअपेक्षीत निकाल लागल्याने काही ठिकाणी आनंद तर काही ठिकाणी दुखवट्याचे वातावरण होते. निकालानंतर बहुतांश ग्रामपंचायतींवर सत्तापरिवर्तन झाले असून वजनदार प्रस्थापितांना गावपुढार्यांना मतदारराजाने ‘धक्का’ दिला आहे. त्यामुळे आपोआपच नवख्यांना संधी मिळाली आहे. काही स्थानिक पातळीवर व तर काही राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षाच्या समर्थनाने बनलेले पॅनल विजयी झाल्याने पक्ष पदाधिकारी आपली सरशी असल्याचे दावे प्रतिदावे करत आहेत. निकालानंतर आता सर्वांची नजर सरपंच पदावर खिळली आहे. कारण निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यावरच निवडणुकीतील खरा ‘सिकंदर’ कोण ठरणार हे स्पष्ट होईल.

गंगाधर ढवळे ,नांदेड

संपादकीय
१८.०१.२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *